नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अॅटोरिक्षातून गोमांस विक्री करणारा चालकाला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. संशयिताच्या जबाबावरून पथकाने कत्तलीसाठी डांबून ठेवलेली गाय आणि दोन वासरूचीही सुटका केली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात सकाळच्या सुमारास अॅटोरिक्षातून चोरीछुपी गोमांसची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलीस कामाला लागली होती. वडाळानाका भागात पथकाने सापळा लावला असता इरफान इस्माईल शेख (४७ रा.भोई गल्ली,बागवानपुरा) हा रिक्षाचालक पोलीसांच्या हाती लागला. एमएच १५ एजे २५१ मधून तो मांस विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून रिक्षासह मांस असा सुमारे ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून त्याच्या जबाबावरून याच भागातील हारूण मटन दुकाना मागील पडक्या घरात बांधून ठेवलेल्या गायीसह दोन वासरूंची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत रफिक जाफर कुरेशी (५५ रा.नागसेननगर,वडाळानाका) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुक्रमे अंमलदार दयानंद सोनवणे व पोलीस नाईक कय्युम सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार शेळके व पोलीस नाईक जुंद्रे करीत आहेत.