पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा काल रात्री पूर्ण करण्यात आला आहे व जवळपास ११ हजार नवीन शिक्षकांची भर शाळांमध्ये पडत आहे. पूर्णपणे पारदर्शक व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण केली गेली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले तर अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर दिले. अधिकृत न्यूज बुलेटीन पोर्टलवर दररोज प्रसारित करण्यात आल्याची माहिती शिक्षण आय़ुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
ते म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या.
या प्रक्रियेदरम्यान जेव्हा जेव्हा काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याचे मंत्रालय स्तरावरून मंत्री शिक्षण व प्रधान सचिव यांनी अत्यंत तातडीने व प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले. या सर्वांच्या परिणाम स्वरूप आज निवड न झालेल्या उमेदवारांमध्ये देखील भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याची भावना आहे व ती तशी त्यांनी बोलून दाखवली आहे.
या उपरही कोणाच्या काही शंका असल्यास त्याचे अधिकृतरित्या निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच “तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची” रचना करण्यात आली आहे. ती सुविधा इमेल द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एकंदरीत इतक्या उचित पद्धतीने निवड झालेले सर्व नवीन शिक्षक, विद्यार्थी घडवण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा आहे.