पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. शनिवारी रात्री अल्पवयीन मुलाचे अपहरण करून, पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पवन पांडे या नराधमाला अटक केली आहे.
हा अल्पवयीन मुलगा आणि पांडेची तीन दिवसांपूर्वी ओळख झाली. पांडे रसवंतीगृहात काम करीत होता. रसवंतीगृहासमोर काही मुले खेळायला यायची. यात हत्या झालेल्या मुलाचादेखील समावेश होता. पांडे अल्पवयीन मुलांना रस द्यायचा. त्यामुळे मुलगा आणि त्याची ओळख वाढली. याचा फायदा घेऊन त्याने शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. त्याला पाषाण येथील परिसरात नेले. तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. नंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.
मुलगा घरी न आल्याने पालकाने त्याचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर त्यांनी पहाटेच्या सुमारास वाकड पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. रविवारी अल्पवयीन आठ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचे तपासानंतर उघडकीस आले. रसवंतीत कामाला असलेल्या पांडेची चौकशी केल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्हीत पांडे आणि अल्पवयीन मुलगा एकत्र जाताना दिसले त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.