इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारने सोलापूर महानगर पालिकेतील कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या २३ कनिष्ठ (स्थापत्य) अभियंत्याना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्पर्धा समन्वय समिती आक्रमक झाली आहे. या समितीने या भरतीचा जीआर सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला.
कंत्राटी स्वरूपातील पदभरती मध्ये उमेदवारांची निवड कोणत्या पद्धतीने होते ते जग-जाहीर आहे. इथ लाखो उमेदवार पाच-सात वर्षांपासून रक्त आटवून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर दुसरीकडे कंत्राटी लोकांना कायम करून लाखो उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचे स्पर्धा समन्वय समितीने व्टीटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वर्षानुवर्षे पदभरतीच्या जाहिराती काढायच्या नाहीत, कंत्राटी भरती करून घ्यायची आणि मग अलगद त्या सर्वांना सामावून घ्यायचे असा सरकारचा डाव आहे. येत्या काळात याच पद्धतीने नोकर भरती होणार असेल तर बेरोजगारांनी स्वतःची उमेदीची वर्षे वाया का घालवायची? याचे मूळ कंत्राटी भरती आहे त्यामुळे कंत्राटी भरती सरसकट रद्द करण्यात यावी आणि जी पदे आहे ती सर्व कायमस्वरूपातच भरण्यात यावी.