ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- श्री श्रीनिवास महोत्सवाच्यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान, श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमिअर मैदान,डोंबिवली (पूर्व) येथे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे , कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज येथे आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन,पवित्र, मंगलमय झाला आहे. तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी-समाधान- आनंद आणतात. मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात, त्याला दुःखातून सुखात आणतात.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावो,या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. लवकरच मंदिराचे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले. त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले, प्रसादाचा लाभ घेता आला.
या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून श्री.शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झाले. त्यांच्या हस्ते अबूधाबीतही मंदिराचे लोकार्पण झाले. देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन झाले व प्रसादाचाही लाभ घेता आला. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद. तिरुपती बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे, त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो, या सदिच्छा. या महोत्सवासाठी तिरूपती बालाजी देवस्थानाचे पदाधिकारी, विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.