इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण केल्या. दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला; परंतु जरांगे यांची आजची भाषा राजकीय आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत बोलले पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करताना तोंड दिले म्हणजे वाट्टेल ते बोलू नये, अशी समज दिली.
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. शिंदे, फडणवीस व पवार यांनी जरांगे यांच्या आरोपावर जोरदार हल्ला केला. मुख्यमंत्री म्हणाले, की जरांगे पाटील प्रामाणिक भावनेने मराठा आरक्षण लढ्यात उतरले होते. त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या. जरांगे पाटील यांच्या भाषेमागे कोणीतरी आहे. फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेले अयोग्य आहे. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर शिंदे म्हणाले, की कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांनी कायदा हातात घेऊ नये
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणे ही आपली संस्कृती नाही, असे सांगून ते म्हणाले, की आरक्षण दिल्यानंतर विरोधी पक्षाला अपेक्षित नव्हते, की इतक्या लवकर आरक्षण मिळेल. सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केले नाही ते सांगा. जनता सुज्ञ आहे. ती तुम्हाला जागा दाखवेल. आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
फडणवीसांवर झालेल्या आरोपांवर पवार हे जरांगे पाटील यांच्यावर संतापले. ते म्हणाले, की कोणीही गैरसमज करू नये, की काहीही बोलले तरी खपून जाईल;परंतु कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, याचा विसर पडू देऊ नका. प्रत्येकाला विरोध करायचा अधिकार असला, तरी काय बोलतो, कोणाबद्दल बोलतो, याचा विचार करण्याची गरज आहे.