नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिड्यूस, रियुज आणि रिसायकल असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करून नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परकेशन बँण्डने शनिवारी (दि. 24) जागतिक विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, एकाच वेळी तब्बल 1250 हून अधिक विद्यार्थी व 263 हून अधिक शिक्षक व कर्मचारी यांनी या बँण्डचे सादरीकरण करत एशिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमाची नोंद केली.
प्रख्यात जेम्बे वादक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बहारदार कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पकतेतून साकार झालेल्या या प्लास्टिक बँण्डद्वारे संगीताबरोबरच सामाजिक बांधिलकीचीही जाणीव विद्यार्थ्यांनी करून दिली. प्रत्येक गोष्टीत संगीत आहे, सूर आहे, कला आहे, ती निर्माण करण्याची, ओळखण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची क्षमता ही निर्माण व्हायला हवी. विद्यार्थ्यांनी हीच कला प्लास्टिकच्या बँडद्वारे शोधत केलेल्या सर्जनशील नवनिर्मितीचे कौतूक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या बँण्डला सर्व स्तरातून चांगली दाद मिळाल्यानंतर शनिवारी 24 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इस्पॅलियर स्कूलच्या युट्युब चॅनलद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या विक्रमाची नोंद याप्रसंगी एशिया बूक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक डॉ. मनोज तत्वादी यांनी घेतली. यावेळी शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
नवीन पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळावे तसेच आपल्या कृतीतून पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा संदेश देण्यासाठी प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत हा सांगितिक बँण्ड तयार करण्यात आला आहे. प्लास्टिकचा कमी वापर करा, पुनर्वापर तसेच पुनर्निर्मिती असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची शपथ घेतली. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करत झाली. या कार्यक्रमाला चेअरपर्सन डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापक अंकिता कुर्या, वैशाली जालिहालकर, सबा खान उपस्थित होते. स्कूलचे संगीतशिक्षक अविनाश गांगुर्डे, विकी रोहम, नरेश लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसोबत साथ दिली.