इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुवाहाटी- देशातील उच्च शिक्षणसंस्थेत अग्रभागी असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकत्र आल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पुण्यातील ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेंद्र शेंडे आणि नाशिक जिल्ह्यातील युवक पियुष गुळवे यांचा पुढाकार निमित्त ठरला आहे. त्यामुळेच देशातील २३ आयआयटींमध्ये पर्यावरण बचावाची नेट झिरो ही मोठी चळवळ सुरू होणार आहे.
इंजिनिअरींग, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात नामांकीत असलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे असंख्य युवकांचे स्वप्न असते. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये शिक्षणाची संधी मिळते. त्याचे सोने करुन हे विद्यार्थी पुढे भारताचे नाव जगभरात गाजवतात. त्यामुळेच आयआयटीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नेतृत्व करताना दिसत आहेत. आणि आता या सर्व आयआयटी एका कारणासाठी एकवटणार आहेत. हवामान बदल, जागतिक तपमान वाढ या वैश्विक समस्यांना रोखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतातील २३ आयआयटी नेट झिरो या मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत.
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. शेंडे हे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच, त्यांच्या नेतृत्वात ग्रीन तेर फाऊंडेशन कार्यरत आहे. याच संस्थेच्यावतीने गुवाहाटी आयआयटीमध्ये नेट झिरो ही कार्यशाळा संचालक डॉ. राजीव आहुजा आणि माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील पियुष गुळवे हा विद्यार्थी सध्या आयआयटी गुवाहाटीमध्ये केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. सध्या तो शेवटच्या वर्षात आहे. तसेच, तो तेथील जिमखान्याचा उपाध्यक्ष आहे. देशभरातील आयआयटींच्या जिमखाना संघटनेचा पियुष हा पदाधिकारी आहे. त्यामुळे ग्रीन तेर फाऊंडेशन आणि पियुषच्या पुढाकारातून आता नेट झिरो ही मोहिम सर्व आयआयटीमध्ये राबवली जाणार आहे.
शिवजयंतीचे निमित्त
गुवाहाटीतील कार्यशाळा २० फेब्रुवारी रोजी झाली. मात्र, त्याच्या पूर्वसंध्येला जगभरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. पियुषच्या पुढाकाराने आयआयटी गुवाहाटीच्या कॅम्पसमध्ये विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्याचवेळी तेथे ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर झाला. त्यात डॉ. शेंडे आणि पियुष यांची भेट झाली. दोघांमध्ये विचारमंथन झाले. त्यानंतर डॉ. शेंडे यांच्या सूचनेनुसार पियुषने नेट झिरो कार्यशाळेत अप्रतिम सादरीकरण केले.
आयआयटीमध्ये नेमके काय घडणार
मानवनिर्मिते कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखून कार्बन न्यूट्रल भारत करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हवामान बदलाच्या समस्येला थोपविण्यासाठी कार्बन न्यूट्रलशिवाय अन्य पर्याय नाही. नेट झिरो म्हणजेच कार्बन उत्सर्जन शून्य करणे. आयआयटीच्या कॅम्पसमध्ये जीवाश्म इंधनांचा वापर कमी करुन पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी अत्यंत कसोशीचा अभ्यास करुन कृती आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर उद्दीष्ट निश्चित केले जाईल. आणि प्रत्यक्ष कृती केली जाईल. वृक्षारोपण, कचऱ्याची निर्मिती न होणे, झाला तरी त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, प्रदूषण होणार नाही अशा तंत्रज्ञान आणि बाबींचा अंगीकार करणे, वस्तूंचा पुनर्वापर, सौर ऊर्जा निर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन यासह अनेक संकल्पनांचा अवलंब केला जाणार आहे.
प्रेरणादायक बाब
हवामान बदल आणि जागतिक तपमान वाढीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पर्यावरणस्नेही कृती असणारी नेट झिरो ही मोहिम अत्यावश्यक आहे. देशातील शेकडो विद्यापीठे आणि हजारो कॉलेजेसमध्ये नेट झिरोचे जाळे विकसित झाले आहे. आता देशातील २३ आयआयटीही नेट झिरोसाठी पुढाकार घेत आहेत. ही जगभरातील उच्च शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणादायक बाब आहे.
डॉ. राजेंद्र शेंडे, संस्थापक संचालक, ग्रीन तेर फाऊंडेशन
संरक्षणाच्या संकल्पना राबविल्या जातील.
आयआयटी जिमखान्यांचे प्रकृती क्लब आहेत. त्याद्वारे आम्ही नेट झिरो मोहिमेला चालना देणार आहोत. तसेच, स्टुडंटस लीडरशीप कॉन्क्लेव्हचे आयोजनही आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून केले जाते. यंदाच्या कॉनक्लेव्हमध्ये नेट झिरो मोहिमेचा अजेंडा मी निश्चित केला आहे. त्यामुळे आगामी काळात देशभरातील आयआयटींमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पना राबविल्या जातील.
पियुष गुळवे, उपाध्यक्ष, आयआयटी गुवाहाटी जिमखाना