इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुलडाणाः लोणार तालुक्यातील सोमठाणा भगर आणि आमटीच्या प्रसादातून विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर सलाईन लावून उपचार करण्यात आलेल्या प्रकाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
भगरीतून पाचशे ते साडेपाचशे लोकांना विषबाधा झाल्याने जवळच असलेल्या बीबी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. अचानक एवढे रुग्ण आल्याने रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपवून रात्रीच्या वेळी उपचार करण्यात आले. या रुग्णालयची क्षमता तीस खाटांची आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर मुंबईतील न्यायालयीन मित्र मोहित खन्ना यांनी उच्च न्यायालयाला रुग्णालयाबाहेर रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ दाखवले. न्यायालयाने स्वतः होऊन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
विषबाधेसारख्या गंभीर प्रकारात रस्त्यात कसे उपचार करू शकतात, असा सवाल आरोग्य विभागाला विचारण्यात आला आहे. जवळपास साडेतीनशे ते चारशे रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपवून उपचार करण्यात आल्याचे व्हिडीओ झळकल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली किंवा चिंताजनक झाली असती तर काय केले असते, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.