नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाशिक ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली आहे.
आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, कवि संमेलन, मान्यवरांची व्याख्याने, मनशक्ती संगीत अशा विविध कार्यक्रम ग्रंथप्रेमी व वाचक यांना अनुभवयास मिळणार आहे. तसेच विविध ग्रंथ व साहित्य प्रदर्शन व विक्री या दोनही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ग्रंथोत्सवास शहरातील नागरिक व ग्रंथप्रेमी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. जोपुळे यांनी केले आहे.
असे आहेत कार्यक्रम….
ग्रंथ दिंडी
मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार 24 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार आहे. ग्रंथदिंडीची सुरूवात कविवर्य कुसुमाग्रज यांचे निवासस्थान येथून होवून राजीव गांधी भवन सिग्नल, सी.बी.एस.सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर सिग्नल, रेड क्रॉस सिग्नल, प. सा. नाट्यगृह नशिक येथे संपन्न होणार आहे.
ग्रंथोत्सव उद्घाटन
आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 27 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचलनाय येथे ग्रंथोत्सव 2023 व अक्षरबाग बालसाहित्य मेळावा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यात जिल्ह्यातील शतकोत्तर ग्रंथालयांचा सत्कार करण्यात येणार असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठ अक्षरबाग मेळाव्यात विद्यार्थी परिसंवाद, साहित्यिकांशी गप्पा, पोवाडा स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, इंद्रधनुषी हे बालनाट्य सादर होवनू शेवटी बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.
बुधवार 28 फेब्रुवारी 2024 रोजी सामाजिक माध्यमे व वाचन संस्कृती या विषयांवर परिसंवाद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवचरित्रा पासून काय शिकावे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात कवि कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या कविता व साहित्यावर आधारित कुसुमाग्रज मराठी विचारमंच पुणे येथील अक्षर रसिक या संस्थेद्वारे प्रस्तुत महावृक्ष कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमांचा अस्वाद ग्रंथप्रेमी व नागरिकांना विनामुल्य घेता येणार आहे.
ग्रंथ प्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य, वाड्मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावी तसेच प्रकाशन आणि ग्रंथ विक्रेते यांना विक्रीसाठी आवश्यक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवामध्ये पुस्तक विक्रेते यांना विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार असून स्टॉल बुकींगसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हरसोरा पार्क, शिंगाडा तला, नाशिक कार्यालाच्या 0253- 2506717 येथे संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथोत्सवास भेट द्यावी असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी केले आहे.