इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला चक्क ट्रॅक्टरच्या टायरखाली चिरडण्याचा प्रयत्न हिंगोलीत करण्यात आला. दुसऱ्या घटनेत पंढरपूरच्या महसूल पथकावर तलवारीचा धाक दाखवून हल्ला करण्यात आला आहे. पथकाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातील चिंचोली गावांमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी आणि कोतवालाला मारहाण करण्यात आली आहे. चिंचोली येथे मागील काही दिवसांपासून अवैध वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्याने तलाठी जगदीश कुलकर्णी हे सहकारी कोतवालासोबत कारवाईसाठी गेले होते. ज्ञानेश्वर पतंगे यांच्यासह दोन जण अवैध वाळूची वाहतूक करीत होते. तलाठी कुलकर्णी यांनी ट्रॅक्टर पकडून कारवाई सुरू करताच चिडलेल्या पतंगे आणि त्यांच्या चालकासह दोघांनी कुलकर्णी यांना मारहाण केली. कोतवालाचा मोबाईल हिसकावून घेतला. कुलकर्णी यांना थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालण्याचा प्रयत्न झाला.
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर पंढरपूर तालु्क्यात थेट हल्ला करण्यात आला. गुरसले येथे कारवाईसाठी पथक आल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी हातात तलवार घेऊन पथकाला धमकावले. जेसीबी आणि टीपर पळवून नेले. महसूल पथकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली.
हिंगोली जिल्ह्यात महसूल पथकावर हल्ल्याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.