इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्रीनगरःकठुआ रेल्वे स्थानकावर मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे थांबलेली मालगाडी उतारामुळे अचानक चालकाविना पठाणकोटच्या दिशेने जाऊ लागली. हे पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर मुकेरियन पंजाबमधील उन्ची बस्सीजवळ ट्रेन थांबवण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ही ट्रेन ताशी ७० ते ऐंशी किलोमीटर वेगाने धावत होती. घाईत एक मालगाडी कठुआ रेल्वे स्थानकावरून पठाणकोटच्या दिशेने लोकोमोटिव्ह पायलटशिवाय निघाली. एक रिकव्हरी इंजिन ट्रेन थांबवण्यासाठी पाठवण्यात आले. मुकेरियन पंजाबमधील उची बस्सीजवळ ड्रायव्हरशिवाय धावणारी मालगाडी थांबली, तेव्हा लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ड्रायव्हरशिवाय गाड्या धावत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ मध्ये बिहारमध्ये श्रमजीवी एक्स्प्रेसच्या चालकाने ती पाटणा यार्डमध्ये उभी केली होती. तांत्रिक बिघाडामुळे गाडी व्यवस्थित थांबू शकली नाही. अशा स्थितीत ट्रेन संथ गतीने पुढे जाऊ लागली. हे पाहून तेथे एकच गोंधळ उडाला. स्टेशन मास्तरांनी तत्काळ त्या मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्याचा इशारा दिला. यानंतर दुसऱ्या ड्रायव्हरने ट्रेनचा पाठलाग करून ट्रेनमध्ये चढून ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली.