इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या काही भागात आजपासून पाच दिवस पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. राज्यात सध्या दिवसा उन्हाच्या झळा जाणवत असताना पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवर आणि जालना, नांदेड जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या वेळी तीस ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. परभणी जिल्ह्यात रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी, लातूर जिल्ह्यात रविवारी आणि मंगळवारी आणि धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम २६ तारखेपासून होणार आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पाऊस होणार आहे.