जालना/मुंबईः मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्यांनवी त्यासाठी आज निर्णायक बैठक बोलावली आहे. दरम्यान, अजय बारस्कार महाराजांनी दुपारी पत्रकार परिषद बोलवली असून, ते जरांगे यांच्याविरोधातील आरोपांचे बाँब फोडणार आहेत.
सरकारकडून आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. काही समाजविरोधी महत्त्वाकांक्षी राक्षसांना उघडे पाडण्याचा इशारा त्यांनी दिला. आजच्या बैठकीत जरांगे काय बोलणार आणि कोणता निर्णय घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यापुढे ‘रास्ता रोको’ आंदोलन करायचे की, धरणे आंदोलन करायचे याबाबत निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. काही गोष्टी कशा घडल्या आणि घडवल्या जाणार आहेत, यावर जरांगे पाटील बैठकीत बोलणार आहेत.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप बारस्कर यांनी केले आहेत. जरांगे यांच्या पाहुण्यांकडे इतके डंपर कसे आले, रातोरात इतका पैसा कसा आला, वाळू तस्करी केली जाते, असे गंभीर आरोप बारस्कर महाराज यांनी केले आहेत. जरांगे यांनी संभाजीराजेंच्या नावाखाली पैसे खाल्ले, त्यांच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, असे त्यांनी सांगितले. बारस्कर माध्यमांसमोर जरांगे यांच्या विरोधात पुरावे सादर करणार आहेत. मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे, तुम्ही तयार राहा असे आव्हान त्यांनी दिले.