इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः ‘आप’ आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर करार झाला. लोकसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर करार झाला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसतर्फे मुकुल वासनिक तर आम आदमी पक्षाकडून संदीप पाठक, आतिशी आणि सौरभ भारद्वाज उपस्थित होते.
वासनिक म्हणाले की, जागावाटपावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत असून त्यावर एकमत झाले आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये पाच राज्यांमध्ये जागावाटपावर करार झाला आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस पक्ष दिल्लीतील चांदनी चौक, उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवणार आहे. तर, आम आदमी पक्ष उर्वरित चार जागा लढवणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाला दोन जागा दिल्या आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार भरूच आणि भावनगर या जागांवर तर काँग्रेस पक्ष उर्वरित २४ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस हरियाणामध्ये ‘आप’ लोकसभेच्या एका जागेवर तर काँग्रेस उर्वरित नऊ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आसाममध्येही जागावाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, गुजरातमध्ये आम आदमी पक्षासोबत जागावाटपावर काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची मुलगी मुमताज पटेल यांनी ट्विट करून गुजरातमधील भरुच लोकसभा मतदारसंघ आम आदमी पक्षाला दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.