नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहावा यादृष्टीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांवर भर दिला. एक दूरदृष्टी घेऊन काम उभे केले. या बळावरच महाराष्ट्र राज्य भारतात आघाडीवर आणले होते. मध्यंतरी हे लयाला गेलेले वैभव आम्ही पुन्हा राज्याला प्राप्त करुन दिले असून परकीय थेट गुंतवणुकीतील ४५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र शासन व पेर्नोड रिकार्ड यांच्यात हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रसन्न मोहिले आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देत महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे. कृषी क्षेत्रासह शेतकऱ्यांचेही आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने अन्नप्रक्रिया उद्योग महत्त्वाचे असून बुटीबोरी येथे 88 एकर क्षेत्रावर साकारणारा पेर्नोड रिकार्ड इंडिया डिस्टिलरी प्रकल्प महत्त्वाचा आहे. सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा गुंतवणुकीतून हा प्रकल्प रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारा ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्याच्या विकासासाठी सात क्षेत्र निवडली आहेत. यात कृषीक्षेत्र, स्टार्टअप, आर्टीफिशियल इंटिलीजन्स यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर येथे आर्टीफिशियल इंटिलीजन्सचे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी गुगलसमवेत काम सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्याच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रायगड हे राज्यातील गुंतवणुकीचे आकर्षण ठरले आहे. रायगडापासून कोकणातील विकासाच्या वाटा भक्कम केल्या जात आहेत. पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ विदर्भ मराठवाड्यातील उद्योगाला, कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या दोन आठवड्यात पावर सबसिडी धोरण जाहीर केले जात असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
परकीय थेट गुंतवणुकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टाई ठरली मोलाची – उद्योगमंत्री उदय सामंत
परकीय थेट गुंतवणूक महाराष्ट्रात अधिक प्रमाणात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उद्योग समुहांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. डाहोस येथे झालेल्या परिषदेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर भर दिल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योजकांचा विश्वास संपादन करता आला, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. उद्योग विभागाचे प्रगती पुस्तक राज्यातील उद्योजकांनी समृद्ध केले असून आमच्याप्रती त्यांनी दाखविलेला विश्वास हाच आम्हाला गतीने कामे करण्यासाठी प्रेरणादायी आहे. बुटीबोरी येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी 88 एकर जागा गरजेची होती. ही जागा अवघ्या 48 तासात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन उद्योग विभागाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भासाठी या प्रकल्पातून एक नवी रुजूवात होत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शाश्वत विकासासह सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपून आम्ही शेतकऱ्यांना बार्ली लागवड व इतर तंत्रज्ञानाकडे वळवू असे पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले.