मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील विक्रोळी आणि वांद्रे कुर्ला संकुल येथील बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांना भेट दिली आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार गुप्ता त्यांच्यासोबत होते.
“हा देशातील पहिला अतिवेगवान (हायस्पीड) मार्गिका प्रकल्प आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. अशा प्रकल्पाची रचना ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते यासाठी अनेक अडचणींवर मात करावी लागते.मात्र तंत्रज्ञान, डिझाइन क्षमता आणि बांधकाम पद्धती समजून घेणे आणि त्यातून बोध घेणे हे प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात असून 1969 पासून अस्तित्वात असलेली शिंकानसेन प्रणाली जगभरात सुरक्षिततेसाठी ओळखली जाते.भारतात या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे प्रणालीबद्दलच्या माहितीचा आधार तयार होत आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. आपला देश 140 कोटी लोकसंख्या असलेला मोठा देश आहे. 1 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेली अनेक शहरे मेगासिटी म्हणजेच प्रमुख शहरे होणार आहेत. अशा शहरांना कमी खर्चात, कमी वेळेत उपाययोजना उपलब्ध करून द्यायच्या असतील , तर अतिवेगवान (हायस्पीड) मार्गिका तयार करण्यात नैपुण्य मिळवावे लागेल. “, हे वैष्णव यांनी अधोरेखित केले.
“आवश्यक परवानग्या आणि मंजुरी मिळाल्यानंतर, प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे आणि बांधकाम वेगाने सुरु आहे , असे अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पाच्या तपशीलाची माहिती देताना सांगितले. या प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी काही नवोन्मेष साकारण्यात आले आहेत.एकाच वेळी एकाच ठिकाणी काम करण्याऐवजी चार ठिकाणांहून समांतर काम सुरू झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सूरत आणि बिलीमोरा दरम्यानच्या हाय स्पीड रेल्वे मार्गिकेचा पहिला विभाग जुलै/ऑगस्ट 2026 मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर एकामागून एक इतर विभाग कार्यान्वित होतील. “, असे त्यांनी सांगितले.
समुद्राखालील बोगदा, भारतातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा जो 21 किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग आहे तो मुंबई एचएसआर येथून सुरू होईल आणि कल्याण शिळफाटा येथे संपेल, असे वैष्णव यांनी सांगितले. यातील 7 किलोमीटरचा भाग ठाणे खाडीत समुद्राखाली असेल. सर्वात खोल बिंदू अंदाजे 65 मीटर खोल आहे. हा बोगदा 40 फूट रुंद असेल.बोगद्यात दोन मार्गिका असतील. एक अप मार्गिका आणि एक डाउन मार्गिका असेल ज्यावर अतिवेगवान रेल्वेगाडी (हायस्पीड ट्रेन ) धावेल. बोगद्याच्या आतही रेल्वे ताशी 320 किमी वेगाने धावेल, अशी माहिती त्यांनी दिली.
अशा प्रकल्पाच्या फायद्यांविषयी बोलताना वैष्णव म्हणाले की, “हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे केवळ वाहतूक प्रकल्प म्हणून पाहिले जाऊ नये. टोक्यो आणि ओसाका दरम्यान हायस्पीड रेल्वे कार्यान्वित केल्यावर – टोक्यो , नागोया, कोबे, क्योटो आणि ओसाका या पाच शहरांची अर्थव्यवस्था वेगाने वाढली. हायस्पीड रेल्वे शहरांना ,1+1 म्हणजे 2 नाही तर 11 अशा स्वरूपात जोडते. या मार्गिकेमुळे निर्माण होणाऱ्या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई, ठाणे, वापी, सूरत, वडोदरा, आणंद आणि अहमदाबाद हे एकच आर्थिक क्षेत्र तयार होईल , असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यामुळे या क्षेत्राला मोठी आर्थिक चालना मिळेल. या प्रकल्पात एक सर्व थांब्यांसह आणि एक मर्यादित थांब्यांसह.अशा दोन प्रकारच्या गाड्या असतील.मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ मर्यादित थांब्यांसह दोन तासांचा असेल आणि जेव्हा रेल्वे गाडी सर्व थांब्यांवर थांबेल तेव्हा अंदाजे 2.5 तास लागतील. त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याशिवाय या मार्गिकेच्या सर्व बिंदूंवर आपोआपच प्रचंड औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकास अपेक्षित आहे.यामुळे पुढील 30-40 वर्षे या प्रदेशात निरंतर विकास होईल. हा पंतप्रधानांची दूरदृष्टी असलेला प्रकल्प आहे यामुळे देशाला दीर्घकालीन फायदा होईल.”