मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी कंपनीच्या सुमारे ४ कोटी ८० लाख रुपयांच्या बिलासंदर्भात पुढील प्रक्रिया करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीकडे ५० हजार रुपयांची लाच मागून या प्रतिनिधीकडून ही लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या (डीआरएम) कार्यालयातील मुख्य कार्यालय निरीक्षकाला अटक केली आहे. सदर खासगी कंपनीच्या प्रतिनिधीने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
पश्चिम रेल्वेला साहित्याचा पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीची बिले चुकती करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितल्याच्या आरोपाखाली सीबीआय आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीत असे म्हटले आहे की ही खासगी कंपनी पश्चिम रेल्वेची नियमित पुरवठादार असून साहित्याचा पुरवठा केल्यानंतर पैसे मिळण्यासाठी ही कंपनी पश्चिम रेल्वेकडे बिले सादर करत असे. सदर कंपनीतर्फे तक्रारदार (खासगी कंपनीचा प्रतिनिधी) वेळेवर बिले मंजूर होऊन कंपनीला पैसे मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लेखा विभागाकडे नियमितपणे पाठपुरावा करतो. नुकतेच सदर कंपनीने पश्चिम रेल्वेला काही साहित्य पुरवले आणि त्याचे सुमारे ४ कोटी ८० लाख रुपयांचे बिल पश्चिम रेल्वेच्या लेखा विभागाकडे सादर केले. तक्रारीत असे म्हटले आहे की या प्रकरणातील आरोपी पश्चिम रेल्वेच्या मुंबईस्थित डीआएम कार्याकायात लेखा विभागात प्रक्रिया अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सदर आरोपीने उपरोल्लेखित बिलावर कार्यवाही करण्यासाठी तक्रारदाराकडून दर लाखाला शंभर रुपये या प्रमाणे ४ कोटी ८० लाख रुपयांच्या बिलासाठी (सुमारे50,000/-रुपये) लाच मागितली असा आरोप आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला मुंबईतील त्याच्याच कार्यालयात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपीच्या परिसरातील दोन ठिकाणी घातलेल्या धाडीत सापडलेली दोषपूर्ण कागदपत्रे आणि स्थावर तसेच जंगम मालमत्ता सीबीआयने ताब्यात घेतली आहेत. आरोपीला आज मुंबई येथील सक्षम न्यायालयात हजर केले असून या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.