नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला ४० वर्षांनंतर अखेर पहिला वर्ग १चा प्रशासकीय अधिकारी मिळाला आहे. श्री. श्रीपाद यशवंत बुरकुले यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या सहायक कुलसचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. व्यवस्थापन परिषद सदस्य तथा उपकेंद्र विकास समिती अध्यक्ष श्री.सागर वैद्य यांच्या प्रयत्नांमुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी बुरकुले यांनी उपकेंद्राच्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी सागर वैद्य, प्रभारी समन्वयक प्रा. डॉ. सानप, उपपरिसर समितीचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
२६ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्र अधिक सक्षम, विद्यार्थी उपयोगी व्हावे यासाठी दोनही उपकेंद्रांना सहायक कुलसचिव दर्जाचा वर्ग १चा अधिकारी देण्यात यावा अशी मागणी सागर वैद्य यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली.
मागील ५ महिने ही निवड प्रक्रिया सुरू होती. या दोनही पदाची जाहिरात, अर्ज छाननी, मुलाखत आदी प्रक्रिया पार पाडण्यात आली. २५ जानेवारीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि सागर वैद्य यांच्या निवड समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगर उपकेंद्रासाठी श्री. शिवप्रसाद घालमे यांची तर नाशिक उपकेंद्रासाठी श्री.श्रीपाद बुरकुले यांची निवड करण्यात आली. श्रीपाद बुरकुले हे पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभाग, पीएच.डी. विभाग, सेट विभागात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासारखा अनुभवी अधिकारी लाभल्याने नाशिक उपकेंद्र अधिक विद्यार्थीभिमुख, सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
विद्यापीठाच्या निर्मितीची ही पायाभरणी आहे..
विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रांच्या इतिहासात आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उपकेंद्राला पहिला वर्ग १चा प्रशासकीय अधिकारी मिळाला आहे. विद्यापीठाच्या आगामी वर्षातील उज्वल प्रगतीची, विद्यार्थीभिमुख तसेच प्राध्यापक, संस्थाचालक यांच्या हिताच्या कामकाजाला गती येईल. लवकरच नाशिक उपकेंद्र विद्यापीठ कॅम्पस म्हणून नावारूपाला येण्यास मदत होईल.. भविष्यातील नाशिकच्या विद्यापीठाच्या निर्मितीची ही पायाभरणी आहे…
सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य
सोयीसुविधा वाढवणे हे उद्दिष्ट
मी स्वतःला नशीबवान समजतो की विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इतिहासातील पहिला अधिकारी होण्याचे सौभाग्य मला लाभले. आगामी काळात NEP चे कार्यान्वयन करणे, नाशिक कॅम्पसमध्ये अधिकाधिक रोजगार देणारे अभ्यासक्रम सुरू करणे, विद्यापीठ घटकांच्या सोयीसुविधा वाढवणे हे उद्दिष्ट असेल.
श्रीपाद बुरकुले, सहायक कुलसचिव