नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार , संशोधन, प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक (कॅबिनेट मंत्री दर्जा) आ.श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे.
२१ फेब्रुवारी, २०२४ रोजी त्यांनी पुणे येथील सायन्स टेक्नॉलॉजी पार्क भेट दिली असता बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वतीने विविध महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक अर्थसहाय्य देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार नाहीसा व्हावा यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असल्याचे यावेळी त्यांनी सांगून येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी त्यांच्यातील उद्योजक निर्माण व्हावे यासाठी कौशल्य विकास, संशोधन , प्रशिक्षण व उद्योजकता निर्माण करणे साठी केद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय अखत्यारीतील पुणे येथील सायन्स टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सोबत शासनाचे वतीने सामंजस्य करार करण्यात येतील असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे चे महासंचालक डॉ राजेंद्र जगदाळे, दैनिक सकाळ चे प्रतापराव पवार, हिंदुस्थान ऍग्रो चे अध्यक्ष डॉ.भारत ढोकणे पाटील, बार्टी पुणे चे महासंचालक सुनील वारे, लिडकॉमचे धम्मज्योती गजभिये, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दिनेश डोके, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे मनीष सांगळे, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे अभय कलगुटकर, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रशांत गेडाम यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहायक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
यावेळी सामाजिक न्याय व दिव्यांग विकास विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांनी बदलत्या काळानुसार दिव्यांगांना रोजगार व कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करुन याबाबत प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची वेबसाईट सुगम्य करणे, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणे, इलेक्ट्रॉनिक साधनं/उपकरणे तयार करणे, बांधकाम व्यवसायाशी निगडित प्रशिक्षण, इलेक्ट्रिक वाहने तयार करणे व त्यासंबंधी प्रशिक्षण देणे या सर्व उपाययोजनातून दिव्यांगांना स्वयंपूर्ण व त्यातून स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी राज्यात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणे व त्यातून संशोधन व प्रशिक्षण माध्यमातून उद्योगजकता निर्माण करणे ही प्रमुख उद्देश सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने ठेवण्यात असल्याची माहिती सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी यावेळी सांगितले. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांसाठी राज्यातील सर्व अधिकारी व दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचे लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.