इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – सरकारने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. सरकारी नोकरी संपुष्टात आणण्याचा प्रकार सरकार करीत असल्याचे आरोप झाले. पण त्यानंतरही वास्तविक पाहता तरुण बेरोजगार कसेही करून नोकरीच्याच प्रतिक्षेत होते. आणि आता त्यानुसार राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून सरकारमधील चार विभागांमध्ये ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय घेतले आहे. हे निर्णय जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पुढीलस महिन्यापर्यंत हा आकडा १ लाखापर्यंत नेण्याचा निर्धार सरकारने केला आहे. नोव्हेंबपर्यंत जवळपास एक लाख शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
त्यात गृह व नियोजन विभागामध्ये जवळपास पाच हजारांवर पदे, जलसंपदा विभागामध्ये ८ हजार, महसूल विभागात तीन हजार, कृषी विभागामध्ये ३ हजार, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामध्ये ४ हजार, वन विभागामध्ये ५ हजार, शालेय शिक्षण विभागात ६ हजार, आदिवासी विभागामध्ये २ हजार, ग्रामविकास विभागात ५ हजारांवर पदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये ६ हजारांवर पदांचा समावेश आहे. याशिवाय उत्पादन शुल्क, सहकार आदी विभागांमध्येही कंत्राटी भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील तरुणाई देखील या निर्णयाचा तीव्र विरोध करत असून, शासन निर्णयांची होळी केली जात आहे. मात्र, तरुणांमधील या असंतोषानंतरही कंत्राटी भरतीचा धडाका सुरूच आहे.
पोलिसांतील पदांची भरती
सुरुवातीला इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ८२१ जागांवर कंत्राटी भरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यावेळी सर्वत्र विरोध करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात तब्बल ५ हजार ५६ पदे भरण्याचा शासन निर्णय प्रसृत करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागातील २३२६ पदेही बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये पोलीस विभागातील कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून खडाजंगी उडाली असताना शासनाने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेतील ३००० पदे भरण्याचा शासन निर्णय प्रसृत केला आहे.
आरक्षणाचं काय होणार ?
सरकारी नोकऱ्या जर कंत्राटी भरतीवर होणार असतील तर या आरक्षणाचं काय होणार ?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थितीत केला आहे. त्यांनी याअगोदर या कंत्राटी भरतीवरही जोरदार टीका केली आहे.