नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्व नागरिकांना दर्जेदार व किफायतशीर दरात सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा करण्यावर राज्य शासनाने कायम भर दिला आहे. या दिशेने लक्षणीय वाटचाल म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात सर्वांगिण सुधारणा करण्यासाठी उत्कृष्ट केंद्राची स्थापना करण्यास तसेच सदर उत्कृष्टता केंद्राचे नियंत्रण आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत करण्यास शासनाने मंजुरी प्रदान केली असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटन संमारंभाप्रसंगी केले.
या कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कोयता फाऊंडेशनचे श्री. अभिषेक गोपालका व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच सन्माननीय निमंत्रित केंद्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल, केंद्र शासनाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सुद, आय.सी.एम.आर. चे डायरेक्टर जनरल डॉ. राजीव बहल, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीचे सेक्रेटरी डॉ. राजेश गोखले, नॅशनल मेडिकल कमिशनचे चेअरमन डॉ. बी.एन. गंगाधर हे दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते. याचबरोबर बांधकाम विभागाचे चिफ इंजिनिअर डॉ. प्रशांत औटी, कोयटा फाऊडेशनचे श्री. रिझवान कोयटा व श्रीमती सुरभी गोयल, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचे डॉ. निशांत जैन व श्रीमती कनुप्रिया गुप्ता उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, डिजिटल लर्निंग स्टुडीओव्दारा ऑनलाईन अध्यापन आणि शिक्षणाचे संरेखन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद, विचार कौशल्य सक्रिय शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वयंनिर्देशित शिक्षण करण्याची क्षमता आहे. एन्क्युबेशन सेंटरव्दारे हे स्आर्टअप आणि आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. फॅकल्टी डेव्हलमेंट अकादमीमार्फत प्रशिक्षण आणि समन्वयन केंद्र म्हणून क्लिनिकल, व्यवस्थापकीय, अध्यापन व आय.टी. क्षेत्रांसाठी उच्च प्रमाणित, उच्च गुणवत्तेचे फॅकल्टी विकास अभ्यासक्रम प्रदान करण्याची कल्पना आहे.
ते पुढे म्हणाले की, सिम्युलेशन लॅबव्दारा सक्षम सिम्युलेशनसह आत्पकालिन सेवा, ऑपरेशन थेअटर, गंभीर स्वरुपातील आजारांसाठी सेवा, नवजात शिशू यांच्यासाठी सेवा उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य आहे. डिजिटल आरोग्य केंद्राव्दारे टेलिमेडिसिनचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात करुन अमुलाग्र बदल घडवून आणणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना आरोग्य अॅप्स, आर्टिफिशिअल इंटॅलिजन्स आणि वेअरेबलसह डिजिटल तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक वापराची समज विकसित करण्याचे ध्येय आहे. केंद्रीय व्यवस्थपित क्लिनिकल ट्रायल्सव्दारा केंद्रीय व्यवस्थापित क्लिनीकल ट्रायल्स केंद्र मानके आणि प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी एक-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करेल. उच्च गुणवत्तेसह वैद्यकीय कर्मचाÚयांची नियुक्ती आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता, सुलभता आणि परवडण्यामध्ये बदल घडवून उत्कृष्टतेच्या केंद्र निर्माण करुन महत्वपूर्ण परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स आरोग्य विद्यापीठात सुरु करण्यास शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या उपक्रमाव्दारे राज्याच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणावर उपयुक्त बदल केले जाणार आहेत. विविध आरोग्य विद्याक्षेत्रातील शिक्षकांची उपलब्धता याचबरोबर रुग्णालयांच्या मूलभूत सुविधा तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या बाबींमध्ये अधिक कार्य करता येऊ शकेल. आरोग्य क्षेत्रात कौशल्य अभ्यासक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा मोठा भाग आरोग्य क्षेत्रात आहे. याचबरोबर पॅरा-क्लिनीकल स्टाफची संख्या वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात वाढला असून डिजिटलाझेशनवर अधिक प्रभावी काम करणे आवश्यक आहे. राज्यात प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत याकरीत शासन प्रयत्नशील आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व उत्तम आरोग्य सेवा या महत्वपूर्ण बाबी आहेत या बाबी समोर ठेऊन शासनाकडून ई-औषधी पोर्टल सुरु करण्यात आले असून त्याचा आरोग्य सेवेत मोठा उपयोग होणार आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, सेंटर ऑफ एक्सलन्सव्दारा आरोग्य क्षेत्रात गुणवत्तापुर्ण शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवा बळकट होण्यासाठी विद्यापीठाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पादारा आधुनिक साधनांच्या मदतीने व्यवस्थापन, डेटा कलेक्शन आदी बाबी करण्यात येणार आहेत याचा संशोधनात महत्वपूर्ण भाग आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, डिजिटल हेल्थ हा सध्या आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाचा मुद्दा ठरत आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात या संदर्भामध्ये सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आरोग्य विद्यापीठ प्रयत्नशील आहे. फॅकल्टी डेव्हलमेंट अॅकॅडमीव्दारा मोठया प्रमाणात विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार त्यासाठी डिजिटल हेल्थ सेंटर कार्य करणार आहे. डिजिटल हेल्थ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून असा अभ्यासक्रम सुरु करणारे आरोग्य विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सेंटर ऑफ एक्सलन्स हे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण काम करणार आहे. मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार विकसित भारतासाठी आरोग्य सेवा भक्कम होणे गरजेचे आहे. यासाठी आयुशमान भारत डिजिटल मिशन उपक्रमाव्दारे काम करण्यात येत आहे. डिजिटल लर्निंग, ट्रेनिंग आणि संशोधनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोयटा फाऊंडेशनचे श्री. अभिषेक गोपालका यांनी विद्यापीठाचे सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात माहिती दिली. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल हेल्थ आणि एन.जी.ओ. ट्रान्सफॉमेशन विषयावर महत्वपूर्ण काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचे श्री. निशांत जैन यांनी सांगितले की, सेंटर ऑफ एक्सलन्सकरीता शासनाचे वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विद्यापीठ यांच्यात समन्वयन करुन ’लर्न अॅण्ड सर्व्ह’च्या धर्तीवर काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कोनशीलेचे अनावरण मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाचे विविध प्राधिकरण सदस्य, शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.