जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धरणगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे उदघाट्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले असून आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना महाखनिजच्या https://mahakhanij.maharashtra. gov. in या प्रणालीवरून वाळू खरेदीची नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
उत्खननासाठी निविदा किंवा परवाना देण्यामागे वाणिज्यिक किंवा महसूल मिळविणे हा एकमेव उद्देश नसून विकास कामासांठी आवश्यक वाळू उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश असून नदीपात्रात वाळू साठल्याने आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्धभवू नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाने 16 फेब्रुवारी, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये वाळू रेतीचे साठवणूक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री याबाबतचे सुधारित सर्वकष धोरण नुसार निश्चित केलेले आहे. त्यानुसार धरणगाव तालुक्यातील वाळू गटासाठी मौजे धरणगाव येथील वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी उदघाटन झाले.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाळूडेपोतून ज्या ग्राहकांना वाळू हवी त्यानी महाखनिज प्रणालीच्या https://mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर वाळू खरेदी मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ग्राहकांना सेतु केंद्रामार्फतच वाळू मागणीची नोंद करता येईल.या नोंदणी वाळूडेपोतून दिनांक 27 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल याची नोंद घ्यावी, वाळू आवश्यक असलेल्या ग्राहकांनी महाखनिज (Mahakhanij) या वेबसाईटवर मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.