इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल केल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नवे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचे लॉन्चिग करण्यात येणार आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत.
‘‘एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!” ही कविता राष्ट्रवादी काँग्रेसने आज शेअर केली आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह मिळणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षासाठी गौरवास्पद बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असे या पक्षाच्या ट्विटल हँडलद्वारे म्हटले आहे.