इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. दिल्ली, गुजरात, हरियाणा आणि गोव्यात दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत; मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका जागेबाबत पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही जागांवरची बोलणी निश्चित होताच अधिकृत घोषणा केली जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली ते गोव्यापर्यंत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात झालेल्या करारानुसार राजधानीतील सातपैकी चार जागांवर आप निवडणूक लढवणार असून काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे; मात्र उत्तर-पश्चिमच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. काँग्रेस गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला दोन आणि हरियाणात एक जागा देणार आहे. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील तर चंदीगडमध्ये आप काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देईल.
गुजरातच्या भरुचच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने ‘आप’ला ज्या दोन जागा देण्याचे मान्य केले आहे, त्यापैकी एक भरुच आहे, ज्यावर अरविंद केजरीवाल यांनी आपले आदिवासी नेते चैत्रा वसावा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे; पण काँग्रेसचे दिवंगत नेते आणि एकेकाळी गांधी घराण्याचे सर्वात विश्वासू अहमद पटेल यांची मुलगी मुमताज निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल अहमद यानेही आपले कुटुंब आणि काँग्रेस कार्यकर्ते आप उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भरुचशिवाय गुजरातमधील भावनगर मतदारसंघातूनही आप निवडणूक लढवणार आहे.