इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे त्रंबकेश्वर येथे सहा एकर जागेत भव्य आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या वास्तूचा भूमिपूजन सोहळा २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या जागतिक स्तरावरील संयुक्त संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादिजी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी शहरातील गणमान्य लोकांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्ह्यातील मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 एकर जागेवर साकारण्यात येणारे हे भव्य आध्यात्मिक संग्रहालय महाराष्ट्रातील एक प्रेक्षणीय स्थळ असेल. ब्रह्माकुमरिज मुख्यालय माउंट आबू येथील ज्ञान सरोवर संकुलात बांधण्यात आलेल्या आर्ट गॅलरीचा अनुभव घेऊन या संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये परमात्म्याचा परिचय, सृष्टीच्या आदी मध्य अंताची माहिती, 4 युगांचे ज्ञान, संगम युगातील परमात्म अवतरणाचा संदेश अशा अनेक बाबी विविध कलात्मक शिल्प, देखावे व चित्रकलेतून साकारण्यात येणार आहे. आत्म अनुभूतीसाठी येथे अनुभूती कक्ष व राजयोग ध्यान कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे.
येथे आमंत्रित लोकांसाठी सेमिनार हॉल द्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिर, राजयोग शिबिर व्यसनमुक्ती शिबिर, तणाव मुक्ती शिबिर असे अनेक कार्यक्रमांद्वारे लाखो लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या अलौकिक आध्यात्मिक संग्राहलयाचा लाभ नाशिककरांनाच नव्हे तर देश विदेशातून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व भक्तांना सुद्धा होणार आहे. आबाल वृद्धांसाठी येथे कलात्मक गार्डन तसेच फन अँड जॉय पार्कची सुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भक्त व पर्यटकांसाठी हे एक मरूस्थल असेल असा विश्वास येथील मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केला आहे. या वास्तूची निर्मिती ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्यांच्या तन, मन धनाने होणार असल्याचे याप्रसंगी दीदींनी भाव व्यक्त केले.