इंडिया दर्पण ऑलनाईन डेस्क
भाजप आमदार राजेंद्र पाटणी (५८) यांचे मुंबई येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाशिम जिल्हयातील कारंजा विधानसभा मतदार संघातून ते भाजपचे आमदार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. देवेंद्र फडणीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.
राजेंद्र पाटणी १९९७ ते २००३ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर २००४ शिवसेनेकडून त्यानंतर २०१४ , २०१९ मध्ये भाजपकडून तीन वेळा कारंजा विधानसभा मतदार संघातून निवडणून आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटणी यांना श्रध्दांजली अर्पण करतांना सांगितले की, अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे.
त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.