इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा खासदार बसप सोडण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी चार खासदार भाजपच्या, तीन खासदार काँग्रेसच्या आणि तीन खासदार समाजवादी पक्षाच्या संपर्कात आहेत.
अमरोहाचे खासदार दानिश अली यांच्यांशी राहुल गांधी यांचे चांगलेच सूर जुळले आहेत. काँग्रेस त्यांना अमरोहामधून तिकीट देणार आहे. बिजनौर मलूक नगरमधील बसप खासदार तसेच लालगंजच्या खासदार संगीता आझाद भाजपच्या संपर्कात आहेत. अफझल अन्सारी यांना यापूर्वीच गाझीपूरमधून समाजवादी पक्षाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. श्रावस्तीचे बसप खासदार राम शिरोमणी वर्मा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. अशा परिस्थितीत मायावती यांनी कोणाशीही युती न करता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांचे भवितव्य अधांतरी आहे.
अखेरच्या क्षणी बसप ‘इंडिया’ आघाडीचा भाग होईल, अशी आशा सर्वांना वाटत होती; मात्र तसे झाले नाही. आंबेडकर नगरचे बसप खासदार रितेश पांडे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. घोशीतील बसपचे खासदार अतुल राय भाजपच्या वाटेवर आहेत. जौनपूरचे बसप खासदार श्याम सिंह यादव हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असून निमंत्रणासाठी उत्सुक आहेत.