मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या नागरी कामांमध्ये अनियमितता असल्याच्या आरोपाशी संबंधित प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून आज केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ८ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३० हून अधिक ठिकाणी झडती घेतली. मुंबई, जम्मू, श्रीनगर, दिल्ली, गुरुग्राम, बागपत, नोएडा, पाटणा, जयपूर, जोधपूर, बारमेर, नागौर आणि चंदीगडसह विविध ठिकाणी ही झडती मोहीम सुरू आहे.
चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (पी) लिमिटेड (सीव्हीपीपीपीएल) ही कंपनी हा प्रकल्प विकसित करत आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध २० एप्रिल २०२२ रोजी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकल्पाशी संबंधित नागरी कामे देताना ई-टेंडरिंगबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही असाही आरोप कंपनीवर आहे. सीव्हीपीपीपीएलच्या ४७ व्या बोर्डाच्या बैठकीत ई-टेंडरिंगद्वारे रिव्हर्स ऑक्शनद्वारे फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला.
मात्र सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करायचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोपही केला गेला आहे. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख ठेवी, मुदत ठेवींमधील गुंतवणूक, विविध शहरांमधील मालमत्ता गुंतवणूक, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत. अधिक तपास सुरू आहे.