मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत तज्ज्ञांच्या मदतीने तीन ते आठ या वयोगटासाठी (पायाभूत स्तर) पुनर्रचित पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम – २०२३ मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे. पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत https://forms.gle/R2U5gUpE8jCRDz816 या लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी केले आहे.
अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या रकाण्यात दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील असावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोस्टाने अभिप्राय पाठविताना त्यावर पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2023 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, 708, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे-411030 या पत्त्यावर पाठवावेत, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.