नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खून करून मयतानेच स्वतः गळफास घेतला आहे असा बनाव करणा-या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व १० हजाराचा दंड जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला. हा गुन्हा अंबड पोलीस ठाणे हद्दीत २९ ऑक्टोंबर २०१९ रोजी पांडूरंग कृपा रो हाऊस नं. डी – १ आशिर्वादनगर, अंबड लिंकरोड येथे घडला होता.
या गुन्हयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी गोपाल शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत, शुभम शेखर कुमावत,लखन शेखर कुमावत या आरोपींनी संगनमत करुन गुन्हयातील मयत रमेश दगा वानखेडे याने आरोपी नं. १ याच्या पत्नीला इशारे केले त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी संगनमत करुन एकत्र जमून मयत रमेश दगा वानखेडे वय ४३ रा. आशीर्वादनगर, अंबड नाशिक याला घरातून बाहेर बोलावून घेऊन तीन जणांनी कमरेचे पटटे काढून त्या पटट्यांनी मयतास बेदाम मारहाण केली व मयतास दुखापती केली. त्यानंतर एकाने हाताने, बुक्यांनी व पायाने मयतास मारहाण केली. त्यावेळी आरोपी गोपाळ कुमावत याने मयतास सोडविण्यास मध्ये येत असलेल्या साक्षीदारांना “तुम्ही मध्ये पडलेत तर तुम्हाला सुध्दा मारुन टाकू” अशी धमकी दिली. त्यानंतर साक्षीदारांनी मयतास व आरोपीना बाजुला सोडवा सोडव केल्यानंतर, आरोपींनी थोडयावेळेनंतर सर्व साक्षीदार बाजुला गेल्यानंतर, त्यांचे घरातील मागील बाजुने मयत वानखेडे यांचे घरात घराचे टेरेस वरुन आंत येवून मयताचा गळा दाबून, त्याला मारुन मयताचे गळयात दोरीने फास लावून मयतास पंख्याला लटकावून खून केला. व सदर खुनाचा पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने मयताने स्वतःच गळफास घेतला असल्याचा बनाव करुन पुरावा नष्ट केला म्हणुन आरोपीविरूध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक एम. डी. म्हात्रे, तत्कालीन नेमणुक अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर यांनी केला. आरोपीविरूध्द मुख्य न्यायदंडाधिकारी येथे दोषारोपपत्र दाखल केले होते, दरम्यानचे काळात आरोपी जामिनावर सुटलेले होते. तथापि सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय येथे सुरू होती. आज एस. डी. जगमलाणी, प्रधान, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी गोपाल शेखर कुमावत (३२) सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवून खालील प्रमाणे शिक्षा सुनावली. तर आरोपी शेखर बंडू कुमावत, शुभम शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत यांना सदर गुन्हयांतून सीपीसी २३५ (१) अन्वये सदर खटल्यातून निर्दोष मुक्त केले आहे.
सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून शिरीष कडवे यांनी कामकाज पाहिले तसेच कोर्ट अंमलदार पोहवा संजय एस. शिंदे, अण्णा कुवर यांनी सहकार्य केले.