मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नांदगाव मतदारसंघात येणा-या मालेगाव तालुक्यातील गावांना भेट देण्यासाठी माजी आमदार पंकज भुजबळ आले होते. यावेळी माजंरे गावाकडे जातांना ग्रामस्थांनी त्यांचा दौरा अडवून घोषणाबाजी सुरु केल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत भुजबळ कुटुंबियांनी मतदारासंघात फिरकू नये, अशी घोषणा दिल्याने माजी आमदार आल्या पायी माघारी फिरले. आज पंकज भुबळ यांचा मांजरे, कौळाणे, नगाव, टाकळी, वऱ्हाणे आदी गावांमध्ये दौरा निश्चित होता. मात्र संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना माघारी पाठविले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार भुजबळ यांना माघारी पाठविले. यावेळी मालेगाव तालुका पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आंदोलक शांत झाले.