इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, ‘मनोज जरांगे हे मारुतीचे शेपूट आहेत. त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांना उपोषणाला बसवायचे ठरवले आहे. त्यात वृद्धांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरा, अशी मागणी केली आहे.
जरांगे यांनी बुधवारी आपले आंदोलन अधिक तीव्र करताना मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांना उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. २४ तारखेपासून गावोगावी ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. जरांगे यांना काही कळत नाही. त्यांनी विनाकारण गाव बंद करण्याचा इशारा दिल्याचा सांगून भुजबळ म्हणाले, की सरकार सर्व गोष्टींवर सकारात्मक विचार करत असताना जरांगे उगीचच गैरसमज निर्माण करत आहेत. ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीही बरळत आहेत.
दहा तारखेच्या उपोषणासाठी जरागे यांनी समाजातील लोकांनाही विश्वासात घेतले नव्हते. श्रेय घेण्यासाठी ते स्वतःच उपोषणास बसले, असा आरोप भुजबळ यांनी केला. सध्या बारावीच्या परीक्षा असताना हे रस्ते बंद करत आहेत. त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही, असे भुजबळ म्हणाले.