नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा शुक्रवारी होणा-या २३ वा दीक्षांत समारंभात २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवीने गौरविण्यात येणार आहे तसचे विविध विद्याशाखेतील १११ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व सन्माननीय अतिथी म्हणून बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगने हे उपस्थित राहणार आहेत.
दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२४८६ स्नतकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना १११ विद्यार्थ्यांना १३९ सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोखरक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551, दंत विद्याशाखा पदवीचे 2195, आयुर्वेद विद्याशाखेचे 871, युनानी विद्याशाखेचे 99, होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 366, बी.पी.टी.एच.
विद्याशाखेचे 254,, पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637, पदवी ऑप्टोमेट्री 52, ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17, बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2864, पी. जी. दंत 497, पी.जी. आयुर्वेद 63, पी.जी. होमिओपॅथी 18, पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02, डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02, पी.जी नर्सिंग 92, पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29, पी.जी. फिजिओथेरपी 15, पी.जी. डि.एम.एल.टी. 87, डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. याच बरोबर मा. कुलपती तथा राज्यपाल यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ’ई-प्रबोधिनी’ व बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट यांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
’सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे उद्घाटन
आरोग्य क्षेत्रात मोठया प्रमाणात संशोधन, जागतिक दर्जाचे आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी विद्यापीठाकडून ’सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या ’सेंटर ऑफ एक्सलन्स’ उद्घाटन कार्यक्रमास केंद्र सरकारचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल व बोस्टन कन्सल्टींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिषेक गोपालका ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारे, मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 09ः45 वाजता विद्यापीठातील सुश्रुत सभागृहात करण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना डी.लिट् ही विद्यापीठाची विशेष समान्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यापीठातर्फे सन 2007 मध्ये पद्मभुषण डॉ. एल. एच. हिरानंदानी, सन 2008 मध्ये डॉ. अनिल कोहली व सन 2015 मध्ये डॉ. सायरस पुनावाला यांना, सन 2016 मध्ये डॉ. प्रकाश आमटे व सन 2019 मध्ये डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
दीक्षात समारंभाचे आयोजन विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत धन्वंतरी सभागृहात सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभाचे https://youtube.com/live/aUjwAqGcwMo?feature=share यु-टयुब चॅनेवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी नोंद घ्यावी.