नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाणवेलीमुळे गोदावरी नदी व इतर उपनद्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे पाणवेलीच्या निर्मूलनासाठी मोहीम राबविण्यात यावी. त्यासाठी उल्हासनगरच्या महानगरपालिका प्रशासनाकडून तांत्रिक अहवाल मागून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.
गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त (करमणुक शुल्क) राणी ताटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, नाशिक मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापक डॉ. आवेश पलोड, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते. या बैठकीस निरीचे डॉ.नितीन गोयल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले की, गोदावरी नदीपात्रातील पाणवेलींचा प्रश्न बिकट असून भविष्यातील आपत्तीचे धोके लक्षात घेवून तात्काळ उपाययोजना करणे आवश्य आहे. सांडपाणी व्यवस्थापनाबाबत यावेळी आढावा घेण्यात आला असून पाहणी करण्यात आलेल्या कंपन्याकडून नदीपात्रात थेट दूषित पाणी सोडण्याचे निर्देशनास येत असेल अशा कंपन्यांवर तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, असेही निर्देश श्री गमे यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीचा आढावा श्री.गमे यांनी घेतला असून यावेळी गोदावरी नदी प्रदूषण विरहीत ठेवण्यासाठी जनजागृती करावी, विविध उपक्रम राबवावे असेही, श्री गमे यांनी यावेळी सांगितले.