इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर: सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पक्ष पळवण्याची स्पर्धा सुरू आहे; पण वेळ आल्यावर शरद पवार हे शेवटचा डाव टाकतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षव जयंत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील हेच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निर्णय घेऊ शकतात, अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली.
जयंत पाटील हे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटचा डाव टाकतील, असे म्हणतात; पण ते शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत, हे विचारून घ्या. नाहीतर शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकायचे, अशी टिप्पणी विखे यांनी केली. शरद पवार यांच्या जवळचा नेता भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती; परंतु शरद पवार गटाकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला होता. त्यानंतर जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार, ही चर्चा काही थांबायला तयार नाही.त्यातच शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे वृत्त आले.
यावर विखे यांनी आता कॉंग्रेस पक्ष काही दिवसांनी संपुष्टात येणार असल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी मुंबईचा सौदा केला असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर विखे म्हणाले, की मागच्या चाळीस वर्षांपासून मुंबई विकणाऱ्यांनी काही ठेवले आहे का विकायचे? आज विकास सुरू आहे, त्याचे पैसे त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांची मळमळ सुरू आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना कोविडच्या पैशातून ज्यांचे नेते महागड्या गाड्या वापरतात, त्यांनी इतरांना प्रश्न विचारू नये, अशी टीका त्यांनी केली.