प्रख्यात जेमबे वादक पंडित तौफिक कुरेशी यांची उपस्थिती
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत परकेशन बँण्ड तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या बँण्डला सर्व स्तरातून चांगली दाद मिळाल्यानंतर आता हेच विद्यार्थी विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाले आहे.
येत्या शनिवारी २४ फेब्रुवारीला प्रख्यात जेमबे वादक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता शाळेतील १५०० हून अधिक विद्यार्थी एकाच वेळेस या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इस्पॅलियर स्कूलच्या युट्युब चॅनलद्वारे होणार असल्याने विद्यार्थ्यांची ही कला बघण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी एशिया बूक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक डॉ. मनोज तत्वादी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नवीन पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळावे तसेच आपल्या कृतीतून पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा संदेश देण्यासाठी प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत हा सांगितिक बँण्ड तयार करण्यात आला आहे. प्लास्टिकचा कमी वापर करा, पुनर्वापर तसेच पुनर्निर्मिती असा संदेश देत तब्बल १५०० विद्यार्थी एकाच वेळी या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन उपस्थित राहून या प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण बघावे, असे आवाहन सचिन जोशी यांनी केले आहे.