इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईःमाजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपातील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका लांबणीवर पडल्या. पण, आता २७ फेब्रुवारीला थेट जागा वाटपाची माहिती देण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. उध्दव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार एकत्र येऊन ही माहिती देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीत जानेवारीमध्ये अनेक बैठका होऊनही तोडगा निघाला नाही. जागावटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच बैठकांना ब्रेक लागला होता. पण, आता त्यातून मार्ग निघाला असून २७ तारखेला बैठक व जागा वाटपाची माहिती दिली जाणार आहे.
जागा वाटप जाहीर करणार असल्याचे सांगितले जात असले तरी वंचित बहुजन आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीही संभ्रमात आहे. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाडसह अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसकडून जागा वाटपाच्या समितीमध्ये होते. त्यामुळे आता अशोक चव्हाणांची जागा कोण असणार हेही पुढे आलेले नाही.