इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत केलेल्या पुण्यातल्या विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली इथल्या महत्वपूर्ण कारवाईत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी एकूण आठ आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
कुरकुंभ एमआयडीसीमध्ये औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन अर्थात एमडी या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात सुमारे ६०० किलोपेक्षा अधिक एम डी जप्त करण्यात आले. पोलिसांनी कंपनीचा मालक साबळे आणि त्याच्यासाठी एमडीचा फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतलं आहे.
कंपनीतून पुणे शहर, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड, मुंबई, मिरा-भाईंदरसह दिल्ली, बंगळुरु आणि हैदराबाद अशा प्रमुख शहरांत एमडीचा पुरवठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना झाली आहेत.
पुण्यात सापडलेल्या ४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन आहे का? नाना पटोले यांचा प्रश्न
पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे काम करत आहे
राज्यात अंमलीपदार्थांचा काळा धंदा जोरात सुरु आहे. याआधी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सोलापूर मध्येही अंमलीपदार्थांचे मोठे साठे सापडले होते. पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली, ड्रग माफिया मात्र मोकाटच राहिले म्हणूनच पुण्यात ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले आहेत. विधानसभेत राज्याचा एक वरिष्ठ मंत्रीच त्यांना धमक्या येत असल्याचे सांगतात यावरून कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते. हे सरकार भ्रष्ट असून फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त आहे.