इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या सर्व आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटातल्या १० आमदारांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या प्रकरणात दिलासा दिलेला असतांना दुसरीकडे उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरुध्द नोटीस बजावली आहे.
उच्च न्यायालयात अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आपोआपच अपात्र ठरतात असा दावा केला आहे.
या याचिकेवर आज न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिर्दोस पूनावाला यांच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटाच्या आमदारांना नोटिसा बजावल्या. त्यांनी आपापली प्रतिज्ञापत्रे येत्या ११ मार्च पर्यंत सादर करावी असे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.