नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार १८,१९ व २० डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या “कनिष्ठ सहाय्यक” या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर बुधवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला असून तो नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या २२ जागांकरिता १८,१९ व २० डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला एकूण २६६७ परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यापैकी १७४२ परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. त्यापैकी २०० गुणांच्या परीक्षेत किमान ४५ टक्के म्हणजे ९० गुण प्राप्त करणाऱ्या ९०६ परीक्षार्थींचा निकाल घोषित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्यात. यासाठी तसेच भरारी पथक प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता “व्हेन्यु ऑफिसर” व सहाय्यक अधिकारी यांची नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.
यातून प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल व त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.