इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा जाहीर केली. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही, तर २४ फेब्रुवारीपासून राज्यातील गावोगावी सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत ‘रास्ता रोको’ तर तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी सर्वांत मोठा ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा त्यांनी दिला.
जरांगे यांनी सगेसोयरे अधिसूचनेच्या अमलबजावणीसाठी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. जरांगे पाटील म्हणाले, की आपल्याला आपली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यला येऊ नये. २४ तारखेपासून राज्यातील सर्वच गावांत सकाळी साडेदहा ते दुपारी एक व सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल. त्यानंतर तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत जगातील सर्वात ‘रास्ता रोको’ केला जाईल. मराठा आरक्षणाचे हे शेवटचे आंदोलन असून कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करू नका. जाळपोळ करू नका.
आमदार, खासदार मंत्र्यांना दारात फिरकू देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे ही गावबंदी असून, निवडणूक काळात आलेल्या उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या गाड्या परत जाऊ देऊ नका. गाड्या ताब्यात घ्या, असे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली. बारावीच्या विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. गरज भासली तर तुमच्या गाड्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षास्थळी पोहोचवा, असे आवाहन करून आमदार, खासदारांना किंमत देऊ नका. तुमच्यामुळे मोठे होऊन तुमच्या जिवावर ते दादागिरी करतात, अशी टीका त्यांनी केली.