अलिबाग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलिबाग येथईल सारल किनाऱ्यावर रेड नॉट (लाल जलरंक) या दुर्मिळ पक्षाचं दर्शन झाले आहे. पक्षी अभ्यासक वैभव पाटील यांनी केलेली ही नोंद, रेड नॉट पक्षाची महाराष्ट्रातील तिसरी तर रायगड जिल्ह्यातील पहिलीच नोंद आहे, त्यामुळे रायगडच्या पक्षी वैभवात एका नवीन पक्षाची भर पडलेली आहे. ‘बहराई फाऊंडेशन’चे हरीश पाटील, सुरेंद्र पाटील, अनुज पाटील आणि आशिष ठाकूर यांच्या समवेत ‘रेड नॉट’ या पक्षाचे निरीक्षण नोंदी करण्यासाठी गेले होते.
रेड नॉट हा पक्षी कॅनडा, युरोप आणि रशियाच्या अगदी उत्तरेकडील टुंड्रा आणि आर्क्टिक कॉर्डिलेरामध्ये प्रजनन करतो, जो आपल्या भारतासाठी हिवाळी स्थलांतरित पक्षी आहे.’बहराई फाऊंडेशन’ने याच बरोबर पाईड व्हीटीयर आणि कॉमन क्वेल पक्षांची महाराष्ट्रातून, तर रेड क्रेस्टेड पोचार्ड या पक्षांच्या रायगड जिल्ह्यातून पहिल्या नोंदी केल्या आहेत.
रेड नॉट या पक्षाची पहिली नोंद झाल्याची वार्ता येताच महाराष्ट्रभरातील पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये एकच आनंदाची लहर पसरल्याने आता दिवसेंदिवस अलीबागच्या सारल किनाऱ्यावर हा पक्षी पाहण्यासाठी पक्षी प्रेमींची संख्या सुद्धा वाढतांना दिसतेय.