मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने ९१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधानाचे वृत्त दिले. हृदविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडीओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते. त्या काळात अमिन सयानींनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडीओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीतरसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रध्दांजली अर्पण करतांन म्हटले आहे की, त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडीओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.