नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉश सी एस आर फाउंडेशन तर्फे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मध्ये ब्रिज कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत अभ्यासात कमी प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य ,सादरीकरण कौशल्य यासह औद्योगिक संस्थांना आवश्यक कौशल्य शिकवले जातात. यासाठी बॉश सी एस आर फाउंडेशन तर्फे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या प्राध्यापकांना ट्रेनिंग देण्यात आले आहे.
दरवर्षी या प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यात ५२ तासांचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. कॉलेजच्या प्राध्यापकांबरोबरच विविध औद्योगिक संस्थांना ट्रेनिंग देणाऱ्या अतिशय प्रथितयश प्रशिक्षकांनाही या कार्यक्रमात समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम समाजातील सर्व विद्यार्थ्यांकरता खुला व मोफत आहे। यावर्षी २५ विद्यार्थ्यांच्या दहा बॅचेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। बॉश सीएसआर फाउंडेशन मार्फत उद्योग व्यवसायातील मनुष्यबळाच्या आवश्यकता असलेल्या आस्थापनांशी संपर्क करून या ट्रेनिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिले जाईल.
अभ्यासात कमी प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक संस्थांच्या मागणीनुसार तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. औद्योगिक संस्थांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता पिरॅमिड सारखी असते त्यात तळातल्या बाजूला फारसे उच्च शिक्षण नसलेल्या परंतु कौशल्य असलेल्या लोकांची खूप आवश्यकता असते. भारतात सर्विस इंडस्ट्री फार वेगाने वाढते आहे. प्रत्येक सर्विस इंडस्ट्रीच्या आवश्यकतेनुसार बेरोजगार लोकांनी कौशल्य प्राप्त केले, तसेच बॉशच्या फिनिशिंग स्कूल सारख्या या अभ्यासक्रमातून विविध कौशल्य आत्मसात केले तर बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागू शकेल. यात विद्यार्थ्यांना बॉश फाउंडेशन तर्फे ट्रेनिंग किट देण्यात आले आहे. या पथदर्शी प्रकल्पातून विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अभ्यासात कमी प्रगती असलेल्या दहावी व बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचे मोफत प्रशिक्षण घेऊन उत्तम नोकरीची संधी प्राप्त करावी असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक ला बॉश सी एस आर फाउंडेशन तर्फे मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक दर्जाची लॅब उभारून देण्यात आलेली आहे. यात ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल वायरिंग, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, सोलर इन्स्टॉलेशन ,कॅड कॅम हे कोर्सेस दीर्घ कालावधीसाठी म्हणजे सहा महिन्यासाठी तसेच अल्प कालावधीसाठी म्हणजे एक आठवड्यासाठी पूर्णपणे मोफत शिकवले जातात.
दीर्घ कालावधीच्या सहा महिन्याच्या कोर्स साठी बारावी इलेक्ट्रॉनिक तसेच इलेक्ट्रिकल मधील एमसीवीसी पास तसेच आयटीआय इलेक्ट्रिशियन कोर्स पास झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तीन महिने कॉलेजलाच या विद्यार्थ्यांना जर्मन स्टॅंडर्ड चे शिक्षण दिले जाते व तीन महिने इंडस्ट्रीज प्रशिक्षण दिले जाते.
या सर्व कालावधीत विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये विद्यावेतन बॉश सीएसआर फाउंडेशन तर्फे दिले जाते. अल्पमुदतीच्या एक आठवड्याच्या कोर्ससाठी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात. हे सर्व प्रशिक्षण सर्वांसाठी खुले व मोफत आहेत. आतापर्यंत बॉश लॅब मध्ये एक वर्षात सातशे विद्यार्थ्यांनी मोफत ट्रेनिंग घेऊन उत्तम नोकरीच्या संधी प्राप्त करून घेतल्या आहेत. बॉश ट्रेनिंग सेंटर तसेच बॉश ब्रिज कोर्स या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोकरीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या आवश्यकतेनुसार ट्रेनिंग देऊन उत्तम नोकरीच्या संधी दिल्या जात आहेत. हा संपूर्ण भारतात एखाद्या महाविद्यालया तर्फे राबवला जाणारा पथदर्शी प्रकल्प आहे.