इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून एक प्रकारचे दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक भ्रष्टाचारात गुंतले आहेत त्यांच्यावर वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली जाते. आणि म्हणून आज असे बोलले जाते की, “भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा..!” आणि या पद्धतीने त्या भाजपच्या बद्दलचे एक वेगळे चित्र देशात तयार केले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले.
कोल्हापूरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, समाजामध्ये काम करणाऱ्या आणि कुठे ना कुठेतरी ज्यांचे हात अडकलेले आहेत आणि भाजप पेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत अशा लोकांना याच प्रकारची दहशत निर्माण करून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि म्हणून हा मोठा संघर्ष आहे. निवडणुका तर आहेतच. पण, हा संघर्ष निवडणुकांपुरता सीमित नाही. या संघर्षाची आपण तयारी केली पाहिजे. जिथे जिथे अन्याय आणि अत्याचार होतो, तिथे संकटग्रस्तांच्या पाठीशी जबरदस्त शक्ती ही उभी करण्याची भूमिका ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि हे जर करायचे असेल तर, देशामध्ये प्रागतिक शक्ती या एकत्रित आणल्या पाहिजे. याबाबतीत आमचे अनेक सहकारी या सर्व गोष्टींसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते बी. राजा, संजय पाटील, सतेज पाटील, जयश्रीताई जाधव, जय तासगावकर, उमा पानसरे, स्मिता पानसरे, पी.व्ही. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, विजय पवार, मेघा पानसरे, प्रवीण गायकवाड आणि अनेक सहकारी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे बद्दल बोलतांना ते म्हणाले की, पानसरे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यामधले; महाराष्ट्रामध्ये २ जिल्हे असे आहेत की, पुरोगामी विचाराला सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका जनतेने केली. त्यामध्ये अहमदनगरचा उल्लेख करावा लागेल आणि कोल्हापूरचा उल्लेख देखील करावा लागेल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये डाव्या विचारसरणीची शक्ती अधिक होती. मला आठवतंय की, अण्णासाहेब शिंदे असो किंवा भाई दत्ता देशमुख असोत असे अनेक डाव्या विचारसरणीमध्ये काम करणारे, उपेक्षितांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारे त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी होते. त्यांचे कुटुंबीय देखील या डाव्या विचारसरणीमध्ये अग्रेसर होते आणि त्यापैकीच कॉम्रेड गोविंद पानसरे होते.
गोविंद पानसरे यांनी अहमदनगर सोडलं आणि शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूर येथे जो कष्टकरी, उपेक्षित आहे, त्याच्या हिताची जपवणूक करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा काळ घालवला. अनेक प्रकारच्या चळवळी त्यांनी केल्या, पण त्या चळवळी सामान्य माणसाच्या भल्यासाठी होत्या. आपले विचार अत्यंत परखड आणि अत्यंत स्पष्ट पणाने मांडणे हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचे वैचारिक लेखन केले. शिवछत्रपतींच्या संदर्भातले त्यांचे जे लिखाण आहे ते अनेक भाषेत प्रसिद्ध झाले. अनेक पुस्तक, अनेक ग्रंथ हे प्रसिद्ध होतात, परंतु शिवछत्रपतींचे वास्तव स्वरूप हे सांगण्यासाठी कॉम्रेड पानसरे यांनी जे लिखाण केलं, त्या पुस्तकाच्या एवढ्या एडिशन निघाल्या की, मला वाटत नाही या देशांमध्ये दुसऱ्या कोणत्या पुस्तकाच्या एवढ्या एडिशन निघाल्या असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तववादी चित्र कॉम्रेड पानसरे यांनी समाजाच्या समोर ठेवले. जवळपास देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्यांचे हे पुस्तक प्रसिद्ध झाले.