मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्यावेळी सोहेल हुसेन शेखच्या वडीलांचे निधन झाले, त्यावेळी त्याची आई फरीदाला अतिशय चिंतेमध्ये वाटत होती. आपल्या दोन मुली आणि मुलगा यांना परिसरातल्या इतर मुलांसोबत भटकण्याची वाईट सवय लागू नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलांना मल्लखांब प्रशिक्षण केंद्रात दाखल केले.
सोहेल तेव्हा फक्त नऊ वर्षांचा होता आणि इयत्ता चौथीत शिकत होता, त्याची मोठी बहीण साहीनसह त्याने चेंबूर येथे सुनील गंगावणे यांच्याकडे मल्लखांबाचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यांची आई अनेक घरांमध्ये काम करून त्यांचा खर्च भागवते.
कुटुंबावरचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी साहीन आता प्रशिक्षक बनली आहे,तर सोहेल शेखने खेळाचा पाठपुरावा सुरू ठेवला आणि सोमवारी मुंबई विद्यापीठाला गुवाहाटी येथील अष्टलक्ष्मी, सूरूजाई येथील क्रीडा संकुलात चौथ्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धेमध्ये पुरुष सांघिक गटात सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबईतील बंट्स संघ महाविद्यालयातून बीकॉम पदवीचे शिक्षण घेत असलेल्या सोहेलने खांबावर 8.20 गुण, दोरीवर 8.40 आणि दोरीवरून लटकणे या प्रकारात 7.90 गुण मिळवले. तर मुंबई विद्यापीठाने 123.50 गुणांसह या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आणि मध्यप्रदेशच्या विक्रम विद्यापीठाला जवळपास चार गुणांच्या फरकाने पराभूत केले.
“ वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही आजी-आजोबांच्या घरी रहावयास गेलो. आमची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असली तरी, माझ्या आईची इच्छा होती की मी आणि माझी बहीण दोघांनीही चांगले भवितव्य घडविण्यासाठी या खेळाचा पाठपुरावा करावा आणि आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आईने कष्टांची पराकाष्ठा केली,” सोहेल म्हणाला. त्याने 12 वर्षाखालील आणि 14-वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत मल्लखांब या खेळात सुवर्णपदके जिंकून आपली योग्यता आधीच सिद्ध केली.
सोहेलला जाणीव आहे की, त्याने सध्या खेळ सुरू ठेवावा यासाठी त्याची आई आणि त्याची बहीण कठोर परिश्रम करत आहेत आणि तो जमेल तसे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो.ज्या खेळाने त्याच्या आयुष्यात असे परिवर्तन घडविले तो खेळून झाल्यावर त्या खेळाचेच प्रशिक्षण पूर्णवेळ देण्याचा तो विचार करत आहे.
खेलो इंडिया चौथ्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धा येथील सुविधांबद्दल बोलताना सोहेल म्हणाला, “मी येथे राहण्याचा आनंद घेत आहे. कार्यक्रमस्थळी उपलब्ध विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहे आणि आदरातिथ्याचा आनंद घेत आहे.”
खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धे विषयी :
चौथ्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धा आयोजन हा भारतातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अनुशासनात्मक – क्रीडा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेला हा उपक्रम, युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. खेलो इंडिया अष्टलक्ष्मी विद्यापीठ क्रीडास्पर्धा, ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये आयोजित केल्या जात आहेत, ज्यामध्ये ऍथलेटिक्स, रग्बी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, बॅडमिंटन, हॉकी, तलवारबाजी, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, मल्लखांब, यांसारख्या क्रीडा शाखांचा समावेश आहे. ज्युडो,टेबल टेनिस,बॉक्सिंग, नेमबाजी,भारोत्तोलन, धनुर्विद्या, कुस्ती आणि योगासन यांचे आयोजन केले जात आहे. जागतिक क्रीडास्पर्धांमध्ये देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करू शकतील, अशा प्रतिभावंत खेळाडूंना शोधून काढणे, हे या क्रीडास्पर्धा उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.