नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तेजस एमके 1ए कार्यक्रमाच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करताना, डिजिटल फ्लाय बाय वायर फ्लाइट कंट्रोल कॉम्प्युटर (डीएफसीसी) एलएसपी ७ या प्रारूपामध्ये समाकलित करून १९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याचे यशस्वीरीत्या उड्डाण करण्यात आले. तेजस एमके1ए साठी स्वदेशी बनावटीचे डीएफसीसी हे बेंगळुरू मधील विमान विकास आस्थापनेद्वारे (एडीई) विकसित केले गेले आहे. राष्ट्रीय विमान उड्डाण चाचणी केंद्राचे विंग कमांडर सिद्धार्थ सिंह केएमजे (निवृत्त) यांनी अशाप्रकारचे पहिले विमान चालवले होते.
संरक्षण संशोधन आणि विकास विभाग आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विमान विकास संस्थेद्वारे तेजस-या हलक्या लढाऊ विमानाचे (एलसीए) यशस्वी प्रमाणन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस एमके1ए या महत्वपूर्ण प्रणालीच्या विकासात आणि यशस्वी उड्डाणात सहभागी असलेल्या डीआरडीओ, आयएएफ, एडीए आणि उद्योगांच्या संयुक्त चमूचे कौतुक केले आणि हे विशेषत्वाने आयात कमी करून आत्मनिर्भरताच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
तेजस एमके1ए हे विहित मुदतीत भारतीय हवाईदलात तैनात करण्याचा आत्मविश्वास द्विगुणित करणाऱ्या या यशस्वी उड्डाण चाचणीतील सहभागी चमूचे संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओच्या अध्यक्षांनी अभिनंदन केले.