इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्वचषकाच्या १० व्या सामन्यात दक्षिण आफ्रिेकेने ५ वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी दारूण पराभव करून ‘या विश्वचषकात काहीतरी उलटफेर करण्याच्या तयारीने आपण आलो आहोत’, असाच संदेश इतर संघांना दिला आहे. या संघाने श्रीलंकेविरूध्द पहिल्या सामन्यात ४२८ धांवाचा डोंगर उभारला होता. आज त्यांनी ऑस्ट्रेलिया विरूध्द देखील ३११ ही मजबुत धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करतांना मात्र कांगारुचा सगळा संघ मात्र ४०.५ षटकात अवघ्या १७७ धावावर परतला.
मिशेल मार्श, डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे ४ महत्वाचे फलदांज कशीबशी २० ही धावसंख्या देखील गाठू शकले नाहीत. त्यानंतर ज्यांच्यावर कांगारुना भरवसा होता असे मॅक्सवेल, विकेटकिपर जोश इंग्लीस, मार्कस स्टॉयनिस यांना तर साधी २ आकडी संख्या देखील गाठता आली नाही. द. आफ्रिेकेच्या कागिसो रबाडाने ३ बळी घेवून ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. मार्नस लाबूशेनने ४६ आणि मिचेल स्टार्कने २७ धावा करून थोडाफार प्रतिकार केला. परंतु, तोपर्यंत सामन्याची सुत्र कांगारूच्या हातात राहीलेलीच नव्हती. या पराभवानंतर केवळ ऑस्ट्रेलियाच्या नावापुढे ० गुण असून नेट रनरेटमध्ये देखील हा संघ चांगलाच पिछाडीवर गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिेकेला फलदांजीचे निमंत्रण दिले होते. विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांपैकी ५ सामने दुस-या डावात फलंदाजी करणा-या संघाने जिंकले आहेत. भारतात ड्यु फॅक्टर आता सामन्यावर प्रभावशाली ठरू लागला असून याच कारणासाठी ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव स्वत:च्या फंलदाजीसाठी राखून ठेवला असावा. परंतु झाले मात्र उलटेच. दक्षिण आफ्रिेकेच्या फलदाजांनी दमदार प्रदर्शन करून ५० षटकात ७ खेळाडूंच्या मोबदल्यात ३११ धावांचे मजबुत आव्हान ऑस्ट्रेलियासमोर उभे केले. क्विंटन डिकॉकने या सामन्यात विश्वचषक २०२३ मधील त्याचे सलग दुसरे शतक साजरे केले. त्याने १०६ चेंडूत १०९ धावा तर केल्याच शिवाय कर्णधार टेम्बा बावूमाच्या सोबतीने पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची मजबुत सलामी दिल्यामुळे आणि नंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी मोलाची साथ दिल्यामुळे ३११ या धावसंख्येवर दक्षिण आफ्रिेकेचा डाव संपला.
या डावात स्टार्क आणि मॅक्सवेल या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर अॅडम झांपा, कर्णधार कमिन्स आणि हेझलवुड यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकात आत्तापर्यंत गोलदांजीत अपेक्षित यश मिळालेले नसल्यानेच सलग दोन पराभवाला सामोर जावे लागले आहे. या स्पर्धेपुर्वीच सप्टेंबर २०२३ मध्ये या दोघांमध्ये झालेली ५ सामन्यांची वन-डे मालिका द.आफ्रिेकेने ३-२ अशा फरकाने जिंकली होती. हाच सराव द.आफ्रिेकेला विश्वचषकाच्या साखळी सामन्यात उपयोगी सिध्द झाला आहे.
आता शुक्रवारी एम.ए.चिंदबरम स्टेडीअमवर न्युझीलंड विरूध्द बांग्लादेश हा सामना होणार आहे. न्युझीलंडचे डेव्हन कॉनव्हाय आणि रचिन रविंद्र हे दोघे फंलदाज चांगलेच फॉर्मात आहेत. बांग्लादेश समोर या दोघांचे आव्हान पेलण्याची क्षमता आहे की नाही? हे या सामन्यात स्पष्ट होईल. अफगाणिस्तानला हरवून बांग्लादेशने गुणांचे खाते खोललेले असले तरी हा सामना त्यांच्यासाठी वेगळा असेल.