नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कवितांच्या कार्यक्रमांना तिकीट काढणारा प्रेक्षक वर्ग यायला सुरुवात झाली आहे. आणि साहित्य व कलाक्षेत्रासाठी याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. सध्या रंगभूमीवरती अनेक कवितांचे दर्जेदार कार्यक्रम सादर होत आहेत. काही फक्त कवितांचे आहेत काही कविता गाणी आणि गप्पांचे. याच कविता गाणी आणि गप्पांच्या धाटणीतला काही वाचलेलं काही वेचलेलं या नावाचा एक नवा कार्यक्रम डोंबिवलीतील वायर्ड एक्सप्रेशन्स या निर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा आलोक ताम्हणकर आणि अमेय वर्तक रसिकांसमोर घेऊन आले आहेत.
या कार्यक्रमाचा एकच प्रयोग कुसुमाग्रजांच्या नगरीत म्हणजे नाशिक येथील कालिदास रंगमंदिरात येत्या शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे जयप्रकाश जातेगांवकर यांच्या सहकार्याने सादर होणार आहे. काही नवीन नव्याने ऐकायची इच्छा असेल तर २३ तारखेला नक्की या. अरुंधतीला भेटायला, मधुराणीला ऐकायला.
एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून बऱ्याच काळापासून चित्रपट व टीव्ही मालिकांमधून सशक्त अभिनयाचे दान रसिकांना देणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले यांची ही मुळ संकल्पना आहे. ह्या संकल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे वायर्ड एक्सप्रेशन्स उभे राहिले आणि काही वाचलेलं काही वेचलेलं हा कार्यक्रम रसिकांसमोर आला आहे. त्याच्या नावाला साजेसाच असलेला हा कार्यक्रम अनेक दिगगजांच्या व नवकवींच्या ऐकलेल्या न ऐकलेल्या कवितांचे सादरीकरण करतानाच त्यातल्याच काही कवितांची गाणी झालेली रसिकांना पाहायला मिळतात.
या कार्यक्रमाबद्दल एकंदरीत सांगायचं झालं तर काही ऐकलेलं काही नव्याने ऐकायला मिळणारं अशा सगळ्या साहित्यिक कलाकृतींची सरमिसळ या कार्यक्रमांमध्ये रसिकांना अनुभवायला मिळते. अभिषेक नलावडे सारखा तरुण गायक, कौस्तुभ दिवेकर सारखा रोज नव्याने मुरणारा वादक आणि ख्यातनाम गिटारीस्ट गिरीजा मराठे या तिघांना सोबत घेत या कार्यक्रमाच्या सादरीकरणाला एक नवीन रंग चढतो.
नुकताच या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे संपन्न झाला. आलेल्या चोखंदळ रसिकांच्या खूप सुंदर आणि वेगळ्या प्रतिक्रिया त्यादरम्यान ऐकायला मिळाल्या. छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची आई झालेल्या ” अरुंधतीची ” म्हणजेच मधुराणी गोखले यांनी रंगमंचावरील ताकद बऱ्याच काळाने रसिकांनी अनुभवली.